अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री सदगुरु सखाराम महाराज पालखी उत्सवाच्या निमित्ताने अमळनेर शहरात सेवाभावाचे सुंदर दर्शन घडले असून, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्सचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजे संभाजी व शिवशक्ती मित्रपरिवाराच्या वतीने नगरसेवक पंकज चौधरी मित्रपरिवाराच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला. पालखी उत्सवाला मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, दिवसभरात हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या यात्रेकरूंना या उपक्रमामुळे ताजेतवाने वाटले.

या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना गटनेते व नगरसेवक पंकज चौधरी, ज्येष्ठ व्यापारी टी. के. भदाणे आणि मनीषशेठ जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध मान्यवरांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. यामध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, ज्येष्ठ नगरसेवक दादा पवार, नगरसेवक महेशबापू देशमुख, शिक्षण सभापती नवीद शेख, बाळासाहेब संदानशिव, श्रीराम चौधरी आदींचा समावेश होता.



