- भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या जाणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेता, अयोध्या कँट – मुंबई आणि बनारस – पुणे या दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ रेल्वे गाड्यांना सुरूवात करण्यात आले आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दुपारी एक वाजता हिरवा झेंडा दाखवून या गाड्यांना मार्गस्थ केले.
- याप्रसंगी भुसावळ रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात आले. स्थानकावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय आणि उत्साही झाले होते. उद्घाटनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः रेल्वेच्या डब्यांमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, “अयोध्या येथे राम मंदिर निर्मितीनंतर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, या दोन नवीन गाड्या सुरू झाल्यामुळे जळगावसह आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांची मोठी सोय होणार आहे. या महत्त्वपूर्ण सुविधेसाठी मी केंद्र सरकारचे आभार मानते.”
दरम्यान, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रक्षा खडसे यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची टक्केवारी वाढत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.” अमृत भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाने जळगाव जिल्ह्यातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, या नवीन रेल्वेसेवेमुळे प्रवासाचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.



