Home क्राईम उन्हाचा भडका! धावत्या अ‍ॅक्टिव्हाने घेतला पेट; शिरसोली नाक्यावर थरार

उन्हाचा भडका! धावत्या अ‍ॅक्टिव्हाने घेतला पेट; शिरसोली नाक्यावर थरार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावकर सध्या भीषण उष्णतेचा सामना करत आहेत. मंगळवारी जळगावचे तापमान तब्बल ४२°C वर पोहोचले असतानाच, शहरातील शिरसोली नाका परिसरात एका धावत्या अ‍ॅक्टिव्हाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळासाठी एकच धांदल उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास शिरसोली नाका येथील शिवाजी उद्यान रस्त्यावरून ही अ‍ॅक्टिव्हा जात होती. यादरम्यान अचानक गाडीतून ठिणगी निघाली आणि काही क्षणातच ज्वाला भडकल्या. वाहनावर मेहरूण रामेश्वर कॉलनी येथील योगेश महाजन (वय ४६) आणि हितेन महाजन (वय १८) हे दोघे स्वार होते. आग लागल्याचे लक्षात येताच दोघांनी प्रसंगावधान राखत गाडीतून त्वरित उडी मारली आणि आपला जीव वाचवला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तीव्र उन्हाळा आणि दुपारी असलेल्या प्रचंड तापमानामुळे वाहनाच्या इंजिन आणि वायरिंगवर अतिरिक्त ताण आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Protected Content

Play sound