मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ, मारहाण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच वेळी संबंधित महिलेच्या पती आणि मुलालाही मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती आणि मुलासह गावात वास्तव्यास असून शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. रविवारी २६ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी संशयित आरोपी राजेश संभाजी मोंढे आणि किरण संभाजी मोंढे यांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

वाद वाढल्यानंतर महिलेच्या पती व मुलालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. सोमवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



