Home Cities जळगाव चौघुले प्लॉटमधील महिला आक्रमक : पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन !

चौघुले प्लॉटमधील महिला आक्रमक : पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन !

0
111


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला मेटाकुटीला आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे संतापलेल्या महिलांनी अखेर आज जळगाव महानगरपालिकेत धडक दिली. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आपले आंदोलन पुकारले.

गेल्या ९० दिवसांपासून परिसरात नळाला पाणी न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. “पाणी द्या, पाणी द्या, महापौर ताई पाणी द्या,” अशा घोषणांनी महानगरपालिका परिसर दणाणून गेला होता.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला. यावेळी प्रशासनाने आपली बाजू मांडताना सांगितले की, कांचन नगर भागात सुरू असलेल्या ‘अमृत योजने’च्या कामामुळे मुख्य पाईपलाईन बाधित झाली आहे, ज्याचा फटका चौघुले प्लॉट परिसराला बसत आहे.

तथापि, महिलांचा वाढता रोष पाहता, प्रशासनाने तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या परिसरासाठी जुन्या पाईपलाईनद्वारे तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाच्या या ठोस आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, पुढील काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. आता प्रशासनाच्या या आश्वासनाची कितपत अंमलबजावणी होते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound