
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालमनावर संस्कार घडवणाऱ्या आणि मनोरंजनासोबत प्रबोधनाची जोड देणाऱ्या ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे उद्घाटन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी “बालचित्रपट महोत्सव म्हणजे प्रबोधन आणि मनोरंजनाचा सुंदर संगम” असे प्रतिपादन करत गुंजाळ यांनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा रोमहर्षक इतिहास उलगडणाऱ्या या चित्रपटाने उपस्थित बालप्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. शिवरायांची बुद्धिमत्ता, पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठा यांचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या प्रसंगांना विद्यार्थ्यांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ म्हणाले की, चित्रपट हे केवळ करमणुकीचे माध्यम नसून संस्कार आणि मूल्यशिक्षण देणारे प्रभावी साधन आहे. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, त्यांना चांगल्या विषयांची ओळख होते आणि इतिहास, संस्कृती तसेच समाजमूल्यांची जाणीव होते. तीन दिवस दाखविण्यात आलेल्या चित्रपटांतून आयोजकांनी मनोरंजनासोबत प्रबोधनाचा अनोखा संगम साधला असून हा उपक्रम अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन आणि पालकशाळेच्या डॉ. वीणा महाजन यांच्या हस्ते पोनि गुंजाळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शैलेश शिरसाठ यांनी केले. श्वेता जैन यांनी आभार मानले.
प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी गाणी आणि खेळांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधत संस्कारक्षम मूल्यांची माहिती दिली. या संवादात्मक उपक्रमामुळे मुलांचा सहभाग अधिक वाढला. चित्रपट, खेळ, संवाद आणि संस्कार या चौफेर संकल्पनांमुळे महोत्सवाची रंगत अधिक खुलून दिसली.
‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मुलांना इतिहासाची ओळख करून देण्याचा आयोजकांचा उद्देश यशस्वी ठरल्याचे यावेळी दिसून आले. केवळ मनोरंजन नव्हे तर गौरवशाली इतिहासाची जाण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून प्रभावीपणे साधला गेला. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकर्ते, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा उपक्रम जळगावच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगळी छाप उमटवणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः बालविकास आणि सांस्कृतिक जडणघडणीच्या दृष्टीने अशा महोत्सवांची गरज अधोरेखित करण्यात आली.



