Home राजकीय भाजपमध्ये प्रवेश करताच राघव चड्ढाचे लाखोंनी घटले फॉलोअर्स !

भाजपमध्ये प्रवेश करताच राघव चड्ढाचे लाखोंनी घटले फॉलोअर्स !


नवी दिल्ली-वृत्तसेवा । आम आदमी पक्षाला (आप) मोठा राजकीय धक्का बसला असून राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राघव चड्ढा यांनी हरभजन सिंग, विक्रमजीत सिंह साहनी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता हे देखील सोबत असल्याचा दावा केला. या राजकीय घडामोडींमुळे राजधानीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत राघव चड्ढा यांच्या सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया उमटली. त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये सुमारे 14 लाखांची घट झाली असून संख्या 14.6 दशलक्षांवरून 13.2 दशलक्षांवर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, तरुण वर्गाकडून उमटलेली ही नाराजीची प्रतिक्रिया मानली जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश करताना राघव चड्ढा यांनी ‘मी चुकीच्या पक्षात योग्य माणूस होतो’ असे म्हणत ‘आप’ नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या विचारधारेपासून आपण दूर गेल्याची भावना होती, असे सांगत त्यांनी जनतेच्या जवळ जाण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, स्वाती मालीवाल यांनीही ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षत्यागाचे समर्थन केले. 2006 पासून केजरीवाल यांच्यासोबत काम केले, प्रत्येक आंदोलनात साथ दिली; मात्र नंतर पक्षात गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःवर हल्ला झाल्याचा आणि एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. संसदेत दोन वर्षे बोलण्याची संधी न दिल्याचा उल्लेख करत त्यांनी केजरीवाल यांना महिलाविरोधी, भ्रष्ट आणि गुंडगिरी करणारे नेते म्हटले.

मालीवाल यांनी पंजाब सरकारवरही अवैध खाणकाम आणि अमली पदार्थांच्या व्यापाराबाबत गंभीर आरोप करत सरकार ‘रिमोट कंट्रोल’वर चालत असल्याचे म्हटले. कोणत्याही दबावाखाली नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षांतरावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी भाजप सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या पक्षांना घाबरत असल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा सुरू झाली’ असा टोला लगावला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजपला ‘बकासुर’ म्हणत टीका केली, तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केले.

‘आप’मधील या मोठ्या घडामोडींमुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राघव चड्ढा यांच्यासारख्या युवा चेहऱ्याच्या निर्गमनामुळे ‘आप’च्या संघटनात्मक आणि प्रतिमेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Protected Content

Play sound