जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन २०२६’मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कला, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक कौशल्याच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या यशामुळे संस्थेचा गौरव उंचावला आहे.
दि. २३ आणि २४ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या या राज्यस्तरीय युवा महोत्सवात राज्यभरातील विविध आरोग्य विज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धात्मक वातावरणात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध वैयक्तिक आणि समूह स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे महाविद्यालयाचा दबदबा अधोरेखित झाला.

स्पॉट पेंटिंग स्पर्धेत बीएस्सी नर्सिंग आठव्या सत्रातील ऋतु भिलावेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावत विशेष लक्ष वेधले. कार्टूनिंग स्पर्धेत सातव्या सत्रातील वैष्णवी वाघमारे हिने तृतीय क्रमांक मिळवत आपल्या कल्पकतेची छाप पाडली. रांगोळी स्पर्धेत आठव्या सत्रातील रजनींदिनी चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकावत रंगकलेतील कौशल्य सिद्ध केले. तर स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत सातव्या सत्रातील दिग्विजय बडे याने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
समूह सहभागातून झालेल्या इन्स्टॉलेशन स्पर्धेत बीएस्सी नर्सिंग सातवे आणि आठवे सत्रातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे द्वितीय क्रमांक पटकावत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. समीक्षा जवाडे, कल्याणी शहाणे, नम्रता घोडमारे आणि विकास जाधव या विद्यार्थ्यांच्या टीमने सर्जनशीलता आणि समन्वयाचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर करत हे यश मिळवले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ही कामगिरी संस्थेच्या गुणवत्तेचे प्रतीक असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्य जस्मित दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भविष्यातही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली.
स्पंदन २०२६ मधील या यशामुळे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने केवळ शैक्षणिकच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला असल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्पर्धांसाठीही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.



