जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान घडलेल्या कथित जातीय स्वरूपाच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ एप्रिल रोजी जळगाव येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
१४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टाकळी येथे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मिरवणुकीदरम्यान काही जातीयवादी व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जाणीवपूर्वक गावातील वीजपुरवठा खंडित करून मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत महिला व युवक जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संबंधितांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच धमकीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर मेहुनबारे पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
याच दरम्यान चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्याशी अरेरावीची व धमकीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. “मी तुझा कार्यक्रम लावतो” अशा शब्दांत दबाव टाकल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर संदीप कांबळे यांना भर रस्त्यात ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी अडवून “तू आमच्या मंगेश दादांच्या विरोधात बोलतोस का” तसेच “तुला घेतो” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचेही सांगण्यात आले. या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या धमकीप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असला तरी अद्याप अधिकृत तक्रार नोंदवून घेतलेली नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच १७ एप्रिल रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून तक्रार नोंदविण्यात आली व संदीप कांबळे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
याच प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व टाकळी येथील बौद्ध तरुणांवर राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. दुसरीकडे, मिरवणुकीवर दगडफेक करणारे आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचेही सांगण्यात आले. संपूर्ण प्रकरणात पीडित समाजाच्या बाजूने उभे राहण्याऐवजी आरोपींच्या बाजूने हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ५०३, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, संदीप कांबळे यांना धमकी देणाऱ्यांना अटक करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व संदीप कांबळे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून २८ एप्रिल २०२६ रोजी चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाहीर जनमोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला.
पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे ईश्वर पाटील, जितेंद्र केदार, प्रा. प्रिती लालपकर, संदीप कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने निष्पक्ष कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.



