Home Cities चोपडा चोपड्यात प्रगणक-पर्यवेक्षकांसाठी तीन टप्प्यात विशेष प्रशिक्षण सुरू

चोपड्यात प्रगणक-पर्यवेक्षकांसाठी तीन टप्प्यात विशेष प्रशिक्षण सुरू


चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथे आगामी ‘जनगणना २०२७’ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी तीन टप्प्यात व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणाद्वारे तालुक्यातील सर्व गावांमध्ये अचूक व प्रभावी जनगणना प्रक्रिया राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

चोपडा येथील पंकज ग्लोबल स्कूलमध्ये २३ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता या प्रशिक्षणाचा शुभारंभ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पहिल्या टप्प्यात २३, २४ आणि २५ एप्रिल या तीन दिवसांत पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात असून जनगणनेतील तांत्रिक बाबी, माहिती संकलनाची पद्धत, तसेच अचूक नोंदणीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

या प्रशिक्षणात तालुक्यातील अडावद, वटार, सुटकार, वडगाव बु., तांदळवाडी, निमगव्हाण, दोंदवाडे, खाचणे, कुरवेल, गोरगावले खु., खडगाव, गोरगावले बु., वडगाव खु., वडगाव सिम, खेडीभोकरी, कठोरे, सनपुले, लासूर, चुंचाळे, वराड, बोरअजंती, गरताड, वेले आणि महारेहोळ या गावांसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांचा समावेश आहे. प्रत्येक गावातील लोकसंख्येची अचूक माहिती संकलित करण्यासाठी त्यांना आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.

प्रशिक्षण सत्रांमध्ये निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, मंडळ अधिकारी मनोज साळुंखे, सहायक महसूल अधिकारी अरुण वसावे, नायब तहसीलदार पी. सी. धनगर, सहायक महसूल अधिकारी सुधीर गरुडकर, मंडळ अधिकारी रविंद्र माळी व सुलेमान तडवी तसेच सहायक शिक्षक दिनेश निघोट हे मार्गदर्शन करत आहेत. तिन्ही दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तर सत्रे आणि प्रत्यक्ष फील्डवर्कसाठी आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.

जनगणना ही शासनाच्या धोरणनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे प्रत्येक प्रगणकाने जबाबदारीने व अचूकतेने काम पार पाडणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी टप्प्यांमध्ये उर्वरित गावांसाठीही असेच प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण तालुक्याचा समावेश होणार आहे.


Protected Content

Play sound