जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा देण्यासाठी “अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप ” हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. हे ॲप Google Play Store वर उपलब्ध असून, विविध योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता मोबाईलवर करता येणार आहे.
महामंडळाच्या योजनांसाठी MahaSwayam Portal हे संकेतस्थळ आधीपासून कार्यरत आहे. मात्र, संगणक किंवा सायबर कॅफेवर अवलंबून राहावे लागत असल्याने अनेक लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी मध्यस्थांमार्फत फसवणुकीच्या घटना घडल्याने वेळ व खर्च वाढत होता.

नव्या मोबाईल अॅपमुळे आता नोंदणी, अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे तसेच अद्ययावत माहिती मिळवणे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन वापरकर्त्यांना मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे ओटीपी पडताळणी करून नोंदणी करता येणार आहे, तर जुन्या लाभार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येईल.
महामंडळाच्या योजनांमध्ये इच्छापत्र (LOI), मंजुरी (Sanction) आणि अनुदान मागणी (Claim) असे तीन प्रमुख टप्पे असून, सर्व आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाली आहे.
तसेच, अनुदान मागणी सादर करणाऱ्या व नव्याने मंजूर लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग असलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी Google Maps च्या साह्याने जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, जिल्हा समन्वयकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होणार आहे.
संगणकावरील सर्व सुविधा आता मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांनी अॅप डाउनलोड करून या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.



