मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचे पडसाद आता देशभर उमटू लागले असून, त्यावरून महाराष्ट्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.
मिडल-ईस्टमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा फटका भारतातील विविध भागांना बसत आहे. सूरतमध्ये या संकटाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडले असून, हजारो मजुरांना रोजगार गमवावा लागत आहे, असे खडसे यांनी नमूद केले.

सूरतमधील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईमुळे स्ट्रीट फूड विक्रेते, छोटे हॉटेल्स आणि ढाबे मोठ्या प्रमाणावर बंद पडले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, मोठ्या संख्येने कामगारांनी आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम उधना रेल्वे स्थानक येथे दिसून आला. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो मजूर आणि प्रवासी स्थानकावर जमले होते. या प्रचंड गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली.
रोहिणी खडसे यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “सूरतमधील दृश्ये अत्यंत वेदनादायक आहेत. गॅस टंचाईमुळे मजुरांच्या हातून रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावले गेले आहेत. हजारो लोक कुटुंबासह स्थलांतर करत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही त्यांनी इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे शहरांमध्येही गॅस टंचाईमुळे हॉटेल्स आणि खानावळी बंद पडण्याचे प्रकार घडले होते. रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतरित झालेल्या तरुणांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता.
सरकारवर टीका करत खडसे म्हणाल्या की, परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही राज्य सरकार निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. “जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही सूरतसारखीच अवस्था निर्माण होऊ शकते,” असा इशारा त्यांनी दिला. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत आणि मजुरांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



