Home Cities जळगाव परशुराम जन्मोत्सवानिमित्त रथपूजन व शोभायात्रेत हजारोंचा सहभाग

परशुराम जन्मोत्सवानिमित्त रथपूजन व शोभायात्रेत हजारोंचा सहभाग


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगवान श्री परशुराम जन्मोत्सव 2026 निमित्त शहरात आज भव्य रथपूजन आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सराफ बाजार परिसरातून सुरू झालेल्या या मिरवणुकीत समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात सराफ बाजारातील भवानी मातेच्या मंदिरासमोर आरती करून करण्यात आली. यानंतर भगवान श्री परशुराम यांच्या रथाचे विधिवत पूजन करण्यात आले आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार शोभायात्रेला प्रारंभ झाला. रथाला आकर्षक सजावट करण्यात आली होती, तसेच मार्गभर फुलांची उधळण आणि जयघोष करण्यात येत होता.

या शोभायात्रेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे मंत्री कॅप्टन आशिष दामले, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा पूनम तिवारी, संस्थापक श्रीकांत खटोड, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजातील विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

मिरवणुकीचा मार्ग सुभाष चौक, टॉवर चौक, नेहरू चौक या प्रमुख मार्गांवरून ठेवण्यात आला होता. या मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून शोभायात्रेचे उत्साहाने स्वागत केले. ढोल-ताशा, लेझीम पथक, गरबा नृत्य यांसह पारंपरिक सादरीकरणांनी वातावरण रंगतदार झाले होते.

विशेष आकर्षण म्हणून राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी मिरवणुकीत लक्ष वेधले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषांमुळे मिरवणुकीला अधिक भव्यता प्राप्त झाली. शेवटी ही शोभायात्रा शिवतीर्थ मैदान येथे समारोप होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Protected Content

Play sound