Home क्राईम मेहरुण परिसरात भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक

मेहरुण परिसरात भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील मेहरुण परिसरात शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, ऐन उन्हाळ्यात एका कुटुंबाचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीच्या रौद्ररूपाने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी दि. १७ एप्रिल रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास भगवान बुधा कोळी यांच्या राहत्या घरी ही आग लागल्याचे समोर आले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नगरसेवक अक्षय वंजारी यांनी तातडीने दखल घेतली आणि मदतकार्य सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या माहितीनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान वाहन चालक प्रकाश चव्हाण, अजय पाटील, देविदास सुरवाडे, रजनीश भावसार आणि इतर कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीची तीव्रता मोठी असली तरी, स्थानिक नागरिकांनीही अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आग विझवण्यासाठी सहकार्य केले.

या आगीमध्ये भगवान कोळी यांच्या घरातील कपडे, चादरी, गादी, धान्याचे डबे आणि दैनंदिन वापराचे सर्व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले आहे. आगीच्या धुरामुळे आणि भीषण स्वरूपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणल्यामुळे शेजारील घरांना आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.


Protected Content

Play sound