Home क्राईम पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: तीन तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; मुद्देमालही हस्तगत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: तीन तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; मुद्देमालही हस्तगत


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या तीन तासांच्या आत चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू जहांगीर देशमुख यांच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या गोडाऊनमधून ९४ हजार ५०० रुपये किमतीचे तीन ए.सी. अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रे फिरवून रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमान नगर, पाचोरा) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले तिन्ही ए.सी. हस्तगत केले.

दुसरीकडे, १५ एप्रिल रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या ३० हजार रुपये किमतीच्या सोन्याची पोत चोरीच्या गुन्ह्याचाही तपास पोलिसांनी याच काळात पूर्ण केला. अशा प्रकारे, पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने दोन्ही गुन्ह्यांमधील मुद्देमाल तीन तासांत हस्तगत केला. या मोहिमेत विलास पाटील, वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, संदीप राजपूत आणि गणेश कुंवर या पोलीस पथकाचा मोलाचा वाटा होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वेळीच वचक बसला असून, जनसामान्यांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे.


Protected Content

Play sound