Home Cities जळगाव जळगावात डुक्कर पालनावर मनपाची कडक कारवाई; ७ दिवसांत हटवण्याचे आदेश

जळगावात डुक्कर पालनावर मनपाची कडक कारवाई; ७ दिवसांत हटवण्याचे आदेश


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात भटक्या वराहांमुळे (डुक्कर) निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर मनपाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने विनापरवाना डुक्कर पालन करणाऱ्यांना तातडीची नोटीस बजावली आहे.

मनपाने जारी केलेल्या नोटिशीनुसार, शहरात नियमबाह्य पद्धतीने डुक्कर पाळले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस मिळाल्यापासून पुढील ७ दिवसांच्या आत सर्व डुक्कर महानगरपालिका हद्दीबाहेर हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३७६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्धारित मुदतीत डुक्कर हलवले नाहीत, तर मनपामार्फत खाजगी एजन्सीच्या मदतीने डुक्कर पकडून त्यांची विल्हेवाट लावली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच, शहरात कुठेही डुक्कर भटकताना आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. या कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी संबंधित पालनकर्त्यांना भरपाई मिळणार नसल्याचेही नोटिशीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

ही कारवाई मनपा आयुक्तांच्या मान्यतेने करण्यात येत असून, उपायुक्त (सामान्य प्रशासन) निर्मला गायकवाड-पेखळे यांनी यासंदर्भात सही केली आहे.

शहर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मनपाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे भटक्या डुक्करांच्या समस्येला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound