Home Cities भुसावळ भुसावळ राजकारण तापले : गायत्री भंगाळे यांच्या आरोपांना भाजपचा जोरदार प्रतिवाद 

भुसावळ राजकारण तापले : गायत्री भंगाळे यांच्या आरोपांना भाजपचा जोरदार प्रतिवाद 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळमध्ये नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपने आज पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचे सविस्तर खंडन केले आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी भंगाळे यांच्या दाव्यांना निराधार ठरवत प्रतिआरोपांची सरबत्ती केली.

काल जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे हे त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. यासोबतच भुसावळच्या पाणी पुरवठा योजनेत अडथळे निर्माण करून नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने आज भूमिका स्पष्ट करत हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषदेत भंगाळे यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची जात प्रमाणपत्रे सादर करत त्या कुरमी ओबीसी प्रवर्गातील असल्याचा दावा केला. त्यांनी स्पष्ट केले की, मंत्री संजय सावकारे किंवा त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षा भंगाळे यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. उलट भंगाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेली तक्रार नियमबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला.

लोणारी यांनी पुढे सांगितले की, नगराध्यक्षा भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र सध्या अंतिम पडताळणीच्या टप्प्यात असून लवकरच यावर समितीचा निर्णय अपेक्षित आहे. त्यांनी असा आरोप केला की, निवडणुकीनंतर सहा महिन्यांत जात पडताळणी करणे बंधनकारक असताना संबंधित कागदपत्रे बोगस असल्यामुळे त्यांचा दावा सिद्ध होऊ शकणार नाही. तसेच भंगाळे यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रात फेरफार झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत नगरसेवक निक्की बत्रा यांनी कथित प्रमाणपत्रातील खाडाखोड दाखवून निवडणूक आयोग आणि राज्य शासनाची दिशाभूल झाल्याचा दावा केला. नगरपरिषदेच्या फॉर्म क्रमांक ४३ आणि नियम क्रमांक ७४ अंतर्गत करण्यात आलेल्या नोंदींमध्ये जातीचा चुकीचा उल्लेख करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन संबंधितांना कारागृहात जावे लागेल, असा इशाराही युवराज लोणारी यांनी दिला.

दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपचे चार नगरसेवक निवडून आल्याचे सांगत नगरसेवक पिंटू कोठारी यांनी भाजप सर्व जाती-धर्मांना समान प्रतिनिधित्व देण्यास कटिबद्ध असल्याचा दावा केला. या संपूर्ण प्रकरणामुळे भुसावळमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Protected Content

Play sound