जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | योग क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य आणि निस्पृह सेवेची पावती म्हणून, प्रसिद्ध योग शिक्षक सुनील मधुकर गुरव यांची महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी पुन्हा एकदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सुनील गुरव यांचा योग प्रसाराचा प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. त्यांनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२५ या काळात महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीला विश्वासात घेऊन गावोगावी योगाचा प्रचार केला. त्यांच्या याच संघटनात्मक कौशल्यामुळे एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. वर्षभरातील त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून संघटनेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

या नियुक्तीबद्दल सुनील गुरव यांची जिल्हा कार्यकारिणीसह, ओम योगा ग्रुप, सन योगा ग्रुप आणि माऊली योगा क्लासच्या सर्व साधकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. “योगाचा प्रचार आणि प्रसार घराघरात पोहचवणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना गुरव सरांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्रात योगाचे नवनवीन उपक्रम राबवले जातील, असा विश्वास योगप्रेमींनी व्यक्त केला आहे.



