जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कायदेशीर क्षेत्रात यश मिळवण्यासाठी केवळ वरवरचा अभ्यास न करता कायद्याच्या प्रत्येक कलमाचा बारकाईने आणि सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (वर्ग-१) ॲड. सुनीलकुमार चोरडिया यांनी केले. जळगाव जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
१७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या मार्गदर्शन शिबिरात आगामी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (APP) भरती आणि नव्या कायद्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर करण्यात आलेल्या गट-अ अंतर्गत २४४ पदांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ज्युनिअर वकिलांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात ॲड. चोरडिया यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) मधील महत्त्वाच्या कलमांचे सुलभ भाषेत विश्लेषण केले. त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) मधील कलम २४, २५(३) आणि नव्या BNSS मधील कलम १९(३) यांतील तांत्रिक फरक स्पष्ट करत अभ्यासाची योग्य दिशा दाखवली. तसेच विधी व न्याय विभागांतर्गत ‘सेक्शन २०’ नुसार असलेल्या प्रशासकीय रचनेची माहिती देत सरकारी वकिलांच्या पदानुक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
विशेष सरकारी वकिलांची नेमणूक प्रक्रिया, त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच जिल्हा सरकारी वकिलांची भूमिका यावरही त्यांनी प्रकाश टाकला. कायद्याच्या क्षेत्रात करिअर घडवताना प्रत्यक्ष अनुभवासोबत सैद्धांतिक ज्ञानाची सांगड घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी BNSS सेक्शन १८७ आणि CrPC सेक्शन १६७ यांतील फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण दिशा दिली. त्यांनी ज्युनिअर वकिलांसाठी दोन महत्त्वपूर्ण घोषणा करत लवकरच वकील लायब्ररीत महागडी आणि दुर्मिळ कायदेशीर पुस्तके उपलब्ध करून दिली जातील, तसेच महाराष्ट्रातील नामांकित कायदेतज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन जळगावात आयोजित केले जाईल, असे सांगितले.
सचिव ॲड. विरेंद्र पाटील यांनीही ज्युनिअर वकिलांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमांमुळे नवोदित वकिलांना अभ्यासासाठी आणि करिअर घडवण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
उन्हाच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करत बार रूममध्ये आयोजित या शिबिराला वकील मंडळींची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी आगामी काळात उपयुक्त ठरणाऱ्या विधिज्ञ सोपान पंडितराव निकम यांच्या पुस्तकाची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमाला ॲड. विरेंद्र पाटील, ॲड. विशाल घोडेस्वार, ॲड. आशिष पाटील, ॲड. स्वाती निकम, ॲड. शिल्पा रावेरकर, ॲड. संजय सपकाळे, ॲड. दीपक महाजन, ॲड. अनिकेत चोपडे, ॲड. सुनील सोनवणे यांच्यासह जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. विरेंद्र पाटील यांनी केले.



