Home Cities मुक्ताईनगर शाळांकडून गणवेश-साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नका; शासनाचे स्पष्ट निर्देश

शाळांकडून गणवेश-साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नका; शासनाचे स्पष्ट निर्देश


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांकडून गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाने जारी केले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून या संदर्भात परिपत्रक काढण्यात आले असून, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विविध शासन निर्णयांचा संदर्भ देत, ११ जून २००४ च्या निर्णयाची पुनरुज्जीवन करत शासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांवर विशिष्ट दुकानातून गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे बंधन घालण्याचा अधिकार नाही.

परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने शासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना अशा तक्रारींची शहानिशा करून दोषी शाळांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, राज्य मंडळ, CBSE आणि ICSE शाळांनी अनुक्रमे NCERT किंवा SCERT (बालभारती) यांच्या मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकांचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके वापरण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, असेही आदेशात नमूद आहे.

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी या परिपत्रकावर स्वाक्षरी केली असून, राज्यातील सर्व शाळांना याबाबत सूचना देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, शाळांच्या मनमानीवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound