Home राजकीय उध्दव ठाकरे विधानपरिषदेत जात असतील तरच पाठिंबा : काँग्रेस

उध्दव ठाकरे विधानपरिषदेत जात असतील तरच पाठिंबा : काँग्रेस


मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. यामध्ये 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चांना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र इतर प्रस्तावांबाबत चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सपकाळ यांनी दिवंगत राजीव सातव यांच्या जागेचाही मुद्दा उपस्थित केला. ही जागा काँग्रेसची असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी मांडलेल्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत ती जागा काँग्रेसला देण्याची मागणी केली. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभेतील संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुती मजबूत स्थितीत आहे. भाजपकडे 131, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ सुमारे 46 असल्याने त्यांचा एक उमेदवार निश्चित विजयी होऊ शकतो. एका उमेदवारासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असल्याने दुसऱ्या जागेसाठी आघाडीला अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे, जी सध्याच्या परिस्थितीत कठीण मानली जाते.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी, तर 4 मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान मतदान होऊन सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण होणार आहे.

या निवडणुकीतून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष या घडामोडींवर लागले आहे.


Protected Content

Play sound