जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू व पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मोठा आधार ठरत असून, जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या दूरदृष्टीतून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरणाचा वेग वाढला आहे. तसेच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आणि समाजातील विविध दाते, धर्मादाय रुग्णालये व संस्थांच्या सहकार्यामुळे निधीची व्याप्तीही वाढली आहे.

या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग उपचार, डायलिसिस, मेंदूचे आजार, नवजात शिशूंचे आजार, अपघातग्रस्त रुग्ण, बर्न आणि विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाउंडेशन आणि Tata Memorial Centre यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार सुलभ होणार आहेत.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४०,७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील १६१० रुग्णांना १३ कोटी ३३ लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.



