Home Cities जळगाव जळगावात राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण हटविण्याची कारवाई; ठिकठिकाणी वाद, गोंधळ

जळगावात राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण हटविण्याची कारवाई; ठिकठिकाणी वाद, गोंधळ


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज, प्रतिनिधी : शहरातील राष्ट्रीय महामार्गाची कोंडी फोडण्यासाठी गुरुवारी प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलले. १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पोलीस दलाने संयुक्तपणे मोठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. या कारवाईमुळे शहरात दिवसभर खळबळ उडाली होती.

कारवाईची सुरुवात अजिंठा चौफुलीजवळील कब्रस्थान परिसरापासून करण्यात आली. मोहिमेच्या सुरुवातीलाच तणावाचे प्रसंग ओढवले. एका कारवर कारवाई करून ती ट्रॅक्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न पथकाने केला असता, संबंधितांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली. पुढे ही मोहीम भंगार बाजार आणि अजिंठा चौफुलीच्या सर्व्हिस रोडकडे वळली. येथे सर्व्हिस रोडवर असलेल्या टपऱ्या आणि भंगार साहित्याचा ढिगारा हटवण्यात आला.

या मोहिमेदरम्यान प्रशासनाला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. भंगार बाजार परिसरातील काही व्यावसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपली अतिक्रमणे काढून महापालिकेला सहकार्य केले. याउलट, लोटगाडी चालक आणि गॅरेज मालकांनी कारवाईला कडाडून विरोध केला. “आम्ही स्वतःहून गाड्या हटवत आहोत, त्या जप्त करू नका,” अशी विनंती करत असतानाच मनपा कर्मचाऱ्यांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. क्रेनद्वारे साहित्य उचलण्याच्या प्रक्रियेवरूनही गॅरेज मालक आणि पथकामध्ये वादावादी झाली.

कारवाईच्या ठिकाणी अतिक्रमणधारकांनी प्रशासनावर दुजाभावाचा गंभीर आरोप केला. “मोठ्या धनदांडग्यांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि केवळ गरीब कष्टकऱ्यांवरच अन्यायाचा हातोडा चालवला जातो,” अशा भावना व्यक्त करत काही नागरिक आक्रमक झाले होते. या गोंधळातच सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या आणि इतर दुकानदारांच्या दुचाकी वाहनांवरही कारवाई करून ती जप्त करण्यात आली.

सदर कारवाई महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) विनंतीनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली असून, भविष्यातही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन उपायुक्त पंकज गोसावी यांनी यावेळी केले. संपूर्ण मोहिमेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 


Protected Content

Play sound