यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हिंगोणा, भालोद मंडळ येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” मोठ्या उत्साहात पार पडले. गतिमान प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या उद्देशाने आयोजित या शिबिरातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट देण्यात आला.
दि. १५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन बबनजी काकडे आणि मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरीय शासकीय कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शिबिरामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना तत्काळ लाभ देण्यात आला. जिवंत सातबारा वाटप उपक्रमांतर्गत एकूण ११९ वारस नोंदींपैकी १३ प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. तसेच १२ उत्पन्न दाखले, ९ शिधा पत्रिका, ११ जात प्रमाणपत्रे आणि ८ अधिवास व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यामुळे नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली.
तुकडा शेरा कमी करण्यासाठी एकूण १३२४ सातबारा प्रकरणांपैकी ११०३ पात्र प्रकरणे निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ११ प्रकरणांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. विशेष अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत ११२ लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. याशिवाय लक्ष्मी मुक्ती सातबारा ३, आदिवासी खातेदार नोंदी ४, घरकुल लाभ २५, आयुष्मान कार्ड २१, बेबी किट २१ तसेच २ लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला बबनजी काकडे, मोहनमाला नाझीरकर, अनिल सुरवाडे, सचिन जगताप यांच्यासह भालोद मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते. तसेच भाजपा यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी, कृषी भूषण नारायण चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती यावल संचालक सागर महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस भरत पाटील, रावेर तालुका अध्यक्ष सूर्यकांत देशमुख, प्रिती राणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. लाभार्थी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली.
शिबिराच्या माध्यमातून प्रशासनाने विविध शासकीय योजना थेट नागरिकांच्या दारात पोहोचवून त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



