Home प्रशासन बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा विस्तार

बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा विस्तार


बुलढाणा: केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या धोरणानुसार, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या विस्तारीत टप्प्यांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १६ हजार १७७ लाभार्थ्यांना नवीन गॅस जोडण्या देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विशेष उज्ज्वला समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जिल्ह्यात उज्ज्वला योजना विस्तारीत-१ अंतर्गत यापूर्वीच १ लाख ८९ हजार ३४७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. आता विस्तारीत टप्पा-२ मध्ये ७५ लाख आणि टप्पा-३ मध्ये २५ लाख अशा एकूण १ कोटी अतिरिक्त जोडण्या देण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात विस्तारीत टप्पा-२ मध्ये ८ हजार ६९४, तर टप्पा-३ मध्ये ७ हजार ४८३ लाभार्थ्यांना यशस्वीरीत्या गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे इंधन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक इंधनामुळे होणारा धूर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या दूर करून धूरमुक्त स्वयंपाकघरांची निर्मिती करणे, तसेच पर्यावरण संरक्षणाला चालना देणे यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. या नवीन गॅस जोडण्यांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होत आहे.


Protected Content

Play sound