यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यालयातील जन्म व मृत्यू नोंद विभागात गंभीर अनियमितता समोर येत असून, तालुक्यातील अनेक ग्रामस्थांना जन्मदाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नोंदी अस्तित्वात असतानाही पंचायत समितीमध्ये त्या नोंदी उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. काही प्रकरणांमध्ये जन्मनोंदींची पानेच गायब झाल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, शासनाने आधार कार्ड दुरुस्ती अथवा नव्याने काढण्यासाठी जन्मदाखला अनिवार्य केल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. सेतू सुविधा केंद्रांकडून शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरला जात नसल्याने नागरिकांना जन्मदाखल्यासाठी पंचायत समितीच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
मात्र, अनेक ग्रामस्थांच्या नोंदी उपलब्ध न झाल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. काही वर्षांच्या नोंदीतील दोन ते तीन पाने गायब असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे कागदपत्रे नष्ट झाली आहेत की जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली आहेत, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीमध्ये नोंदी आढळून येत असताना पंचायत समितीमध्ये त्या उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पर्यायी उपाययोजना करावी, तसेच पूर्वीप्रमाणे आधार कार्डसाठी शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरावा, अशी मागणी त्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे.