Home प्रशासन नगरपालिका भडगावात टोकनसाठी शेतकऱ्यांची गर्दी ; अफवेमुळे सकाळपासून लांबच लांब रांगा 

भडगावात टोकनसाठी शेतकऱ्यांची गर्दी ; अफवेमुळे सकाळपासून लांबच लांब रांगा 

0
105

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन मिळणार असल्याच्या अफवेने भडगाव येथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. कोणतीही अधिकृत सूचना किंवा आदेश नसतानाही सकाळपासूनच शेकडो शेतकरी केंद्रावर दाखल झाले आणि टोकन मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. अचानक झालेल्या या गर्दीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतकरी संघाकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसतानाही टोकन वाटप सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ग्रामीण भागातून अनेक शेतकरी आपापल्या धान्याच्या विक्रीच्या आशेने केंद्रावर दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही टोकन प्रक्रिया सुरू नसल्याचे समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

परिस्थिती हाताळण्यासाठी भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेतकरी संघाच्या संचालक मंडळासोबत समन्वय साधत शेतकऱ्यांची समजूत काढली. पोलिसांनी संयमाने परिस्थिती नियंत्रणात आणत शेतकऱ्यांना शांततेने घरी परत जाण्याचे आवाहन केले.

शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, टोकन वाटपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. योग्य नियोजन करून लवकरच अधिकृत सूचना व आदेश जारी केले जातील आणि त्यानुसारच टोकन वाटप होईल, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.


Protected Content

Play sound