जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून उत्सुकता लागून असलेली जळगाव ते इंदूर विमान सेवा लवकरच सुरू होणार असून फ्लाय-९१ कंपनीच्या माध्यमातून याचा शुभारंभ होणार आहे.
जळगाव विमानतळावरून विविध महत्वाच्या शहरांना सेवा दिल्या जात असून आता याच्या विस्तारास प्रारंभ झाला आहे. जळगवकरांसाठी महत्वाचा हवाई मार्ग म्हणजे जळगाव ते इंदूर होय. एक तर इंदूर येथे जळगाव जिल्ह्यातून अनेक प्रवासी नित्यनेमाने जात असतात. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे इंदूर येथून दिल्लीसह देशातील सर्व महत्वाच्या महानगरांना जाण्यासाठी दैनंदिन विमानसेवा आहे.

यामुळे जळगाव ते इंदूर विमानसेवा सुरू करण्यात यावी अशी कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. मध्यंतरी याला परवानगी मिळून एप्रिल महिन्यात याचा शुभारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या सेवेला अल्प विलंब होणार असला तरी येत्या काळात जळगावहून इंदूरला हवाई मार्गाने जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
तूर्तास जळगावहून इंदूरला सुरू होणारी नियोजीत विमानसेवा ही काही परवानग्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात काही प्रशासकीय आणि तांत्रीक मान्यतांचा समावेश आहे. हा अडसर सुरू होताच साधारणपणे महिनाभरात ही विमान सेवा सुरू होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही विमान सेवा फ्लाय-९१ या कंपनीच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. सध्या ही विमान कंपनी जळगाव येथील प्रवाशांना विविध शहरांशी कनेक्ट करत असून आता यात लवकरच इंदूरचा देखील समावेश होणार आहे. जळगाव ते इंदूर विमान सेवा सुरू झाल्यास याचा जळगाववासियांची कनेक्टीव्हिटी वाढण्यास उपयोग होणार आहे.



