धरणगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याजी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘राज्याजी नाईक स्मृती कलश यात्रा’ आज धरणगाव येथून भक्तिभावाने प्रारंभ झाली असून, धरणगाव, चोपडा आणि शिरपूर या तीन तालुक्यांतून प्रवास करत ११ एप्रिल रोजी आंबापानी येथे समारोप होणार आहे.
या यात्रेमध्ये तीन आकर्षक चित्ररथ स्वरूपातील वाहने सहभागी झाली असून, यात्रेसोबत सुमारे २० कार्यकर्ते तसेच भजनी मंडळ सहभागी झाले आहे. भक्तिमय वातावरणात निघालेली ही यात्रा विविध गावांमध्ये धार्मिक संदेश आणि सामाजिक एकात्मतेचा जागर निर्माण करत आहे. गावोगावी नागरिकांकडून यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, ठिकठिकाणी पूजन आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

९ एप्रिल रोजी धरणगाव तालुक्यातील स्मृती मंदिर, हिंगोणे बु. व खु., पिंप्री, हनुमंतखेडे, सोनवद, बाभूळगाव, अहिरे, मामर्डी आणि खर्दे या गावांमधून यात्रा मार्गक्रमण करत नांदेड येथे मुक्कामी थांबली. या टप्प्यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत यात्रेचे स्वागत केले.
१० एप्रिल रोजी यात्रा चोपडा तालुक्यात प्रवेश करून चहाडी, मालापूर, बोरअजंटी, वैजापूर, शेनपाणी, खान्यापाडा, गौऱ्यापाडा, उमरटी आणि मोरचिडा या गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. या दिवशी सत्रासेन येथे यात्रेचा मुक्काम असेल. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर धार्मिक वातावरणात भजन, कीर्तन आणि प्रार्थना सत्रांचे आयोजन केले जात आहे.
११ एप्रिल रोजी यात्रा शिरपूर तालुक्यातील खामखेडा, आंबा, खंबाळा, जायदा, सांगवी, पळासनेर आणि बारवापाडा या गावांमधून पुढे जात आंबापानी येथे समारोप होणार आहे. या अंतिम टप्प्यातही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



