Home Cities जळगाव जळगावात राष्ट्रीय हॅकाथॉनला देशभरातून प्रतिसाद ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नवोन्मेषाला बळ 

जळगावात राष्ट्रीय हॅकाथॉनला देशभरातून प्रतिसाद ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नवोन्मेषाला बळ 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉनला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात नवोन्मेषाचा उत्साह पाहायला मिळाला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाने विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यासोबतच समाजाभिमुख उपाययोजना मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या हॅकाथॉनला जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.) यांनी भेट देत विविध प्रकल्पांचे अवलोकन केले. त्यांनी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देत समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेत मांडण्यात आलेल्या समस्या विधानांबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, या विषयांचा थेट संबंध वास्तव जीवनाशी असून शाश्वत विकासाशी निगडित उपाय शोधण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपाययोजना केवळ तांत्रिक मर्यादेत न राहता समाजाच्या गरजांशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी घुगे यांनी GIS, ब्लॉकचेन आणि कॉम्प्युटर व्हिजन या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अधिक संशोधन व काम करण्याची गरज व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वतःच्या शैक्षणिक प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “मी स्वतः COEP मधील संगणक शास्त्राचा विद्यार्थी असून आज प्रशासनात कार्यरत असलो तरी नवीन तंत्रज्ञान शिकण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.” त्यांच्या या विधानाने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत नवीन कल्पना आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा स्तरावर भविष्यात अशा अधिक हॅकाथॉन आयोजित करण्याचे आश्वासन देत त्यांनी नवोन्मेषाला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

या हॅकाथॉनमध्ये ४८ तासांचा हार्डवेअर आणि ३६ तासांचा सॉफ्टवेअर हॅकाथॉन असे दोन विभाग होते. हार्डवेअर विभागाचा समारोप २ एप्रिल २०२६ रोजी झाला, ज्यात लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबईच्या ‘न्यूरोवेन्ट’ गटाने प्रथम क्रमांक पटकावला, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या ‘प्रेडिटर’ गटाने उपविजेतेपद मिळवले. सॉफ्टवेअर हॅकाथॉनचा समारोप ४ एप्रिल २०२६ रोजी झाला असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या ‘रन टाइम्स रुलर्स’ गटाने विजेतेपद मिळवले, तर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिकच्या ‘इनकिबिक्स’ गटाने उपविजेतेपद पटकावले. विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी आयोजनाबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.


Protected Content

Play sound