जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहनचालकांचे कंबरडे मोडले असून, या दरवाढीच्या विरोधात वीर सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार, ७ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले. शासनाचे गॅस वितरकांवर नियंत्रण नसल्यामुळे मनमानी पद्धतीने दर आकारले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून, तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गॅसचे दर ५३ रुपये लिटर असताना युद्धजन्य परिस्थितीचे कारण देऊन त्यात सातत्याने वाढ करण्यात आली. आधी ५९ वरून ६५ आणि त्यानंतर ८५ रुपये अशी वाढ होत असताना आता थेट १२५ रुपयांपर्यंत दर नेऊन वाहनचालकांची लूट केली जात आहे. रिक्षाचालकांनी अल्प प्रमाणात भाडेवाढ केली तरी प्रवासी आणि शासन त्यांना टार्गेट करते, मात्र गॅस दरवाढीच्या मूळ प्रश्नाकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सर्व घटक एकमेकांशी साखळी पद्धतीने जोडलेले असताना केवळ वाहनचालकांनाच परक्यासारखी वागणूक का दिली जाते, असा संतप्त सवाल युनियनने उपस्थित केला आहे.

दरवाढीमुळे रिक्षाचालकांचा प्रपंच चालवणे कठीण झाले असून, शेतकरी आत्महत्यांनंतर आता रिक्षाचालकांवरही आत्महत्येची वेळ येणार का, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. गॅस वितरकांवर कोणाचाही अंकुश नसल्याने भ्रष्टाचार फोफावला असून, त्याचा फटका गरीब वाहनचालकांच्या कुटुंबाला बसत आहे. या परिस्थितीमुळे रिक्षाचालक होरपळून निघत असून शासनाने आमचे गाऱ्हाणे ऐकून तातडीने न्याय द्यावा, अशी आर्त हाक वाहनचालकांनी दिली आहे.
या प्रसंगी वाल्मिक सपकाळे, संजय अडकमोल, रामेश्वर सोनार, भास्कर ठाकूर, सुरज पाटील, शांताराम पाटील, बाळू पाटील, किरण पाटील, संजय चंद्रकांत, दिनकर ठाकरे, निलेश पाटील, रवींद्र कोळी, सागर सोनवणे, अभिजित बाविस्कर, सुरेंद्र सपकाळे, अमोल तायडे, संजय पाटील, राजेंद्र चौधरी, संभाजी पाटील, संदीप कुमावत, पंकज जाधव, दिलीप पाटील, दिनेश देवरे, विजय सोनवणे, प्रमोद सोनवणे, विलास ठाकूर, अशोक जाधव, शशिकांत जाधव, एकनाथ बारी, शुभम माळी, कैलास माळी, शिवाजी पाटील, गोविंदा माळी, मनोहर चौधरी, पोपट ढोबळे, सुदोधन तायडे, शिवानंद पाटील, राज तडवी, सय्यद रहमान अली, गोपाळ गवई, गजानन सगणे, विजय बोरणारे, मुकेश पाल, गिरीश येवले, सचिन पाटील, किशोर शिंदे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक रिक्षाचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



