सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व असलेल्या माजी नगराध्यक्ष ताराबाई गजाननराव वानखेडे यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तत्काळ शहरातील डॉ. सुनील चौधरी यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरातील नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

ताराबाई वानखेडे या माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या मातोश्री होत. त्यांनी आपल्या कार्यकाळात नगरपालिकेच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. शहरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची धडपड आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे त्या लोकांमध्ये लोकप्रिय होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण सावदा शहरालाही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ताराबाई वानखेडे यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ९ वाजता संभाजी चौक येथील त्यांच्या निवासस्थानातून निघणार आहे.



