Home Uncategorized नांद्रे जवळ कार अपघात; नाशिकच्या तरुणाचा मृत्यू, पत्नी-भाची जखमी

नांद्रे जवळ कार अपघात; नाशिकच्या तरुणाचा मृत्यू, पत्नी-भाची जखमी


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा-मोहाडी मार्गावरील नांद्रे गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार कटमुळे झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात मृताच्या पत्नी व भाची देखील जखमी झाल्या असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक येथील गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात राहणारे अमित मोहनसिंग कायटे (वय २४) हे ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह मोहाडीहून नाशिककडे कारने (एमएच २० सीएन ९३३३) प्रवास करत होते. सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास नांद्रे गावाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येत त्यांच्या कारला अचानक कट मारला.

या अनपेक्षित धडकेमुळे अमित कायटे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातात अमित यांच्या पत्नी राधिका अमित कायटे आणि त्यांची भाची खुशी या दोघींनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या प्रकरणी राधिका कायटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक हरीश गवळी करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound