मुंबई-वृत्तसेवा | देशात सुमारे २२ कोटी नागरिक आजही फीचर फोनचा वापर करत असून स्मार्टफोनकडे वळण्याची त्यांची इच्छा असली तरी वाढत्या किमतीमुळे हे स्वप्न अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. स्मार्टफोन आणि फीचर फोनमधील किंमतीतील मोठा फरक हा या बदलातील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.
सध्याच्या परिस्थितीत एक विश्वासार्ह एंट्री-लेव्हल स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फीचर फोनच्या तुलनेत किमान ₹४ ते ₹६ हजार रुपये अधिक खर्च करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, मेमरी चिपच्या किमती वाढल्यामुळे हा फरक पुढील काळात ₹६ ते ₹८ हजारांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्टफोन खरेदी करणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, महागडे स्मार्टफोन हे ‘डिजिटल इंडिया’च्या उद्दिष्टांसाठी मोठे आव्हान आहेत. सध्या बेसिक स्मार्टफोनची किंमत ही एका सामान्य वापरकर्त्याच्या मासिक उत्पन्नाच्या ३० ते ४० टक्क्यांपर्यंत जाते, जी परवडण्याच्या निश्चित ५% मानकापेक्षा खूपच जास्त आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी पीएलआय (उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन) योजनेला ‘मेक इन इंडिया’पासून पुढे नेत ‘अफोर्डेबल इन इंडिया’कडे वळवण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या देशातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन ₹५७९९ पासून उपलब्ध आहे, तर 5G स्मार्टफोनसाठी किमान ₹८९९९ मोजावे लागतात. दुसरीकडे, फीचर फोन केवळ ₹६४९ ते ₹८३५ या दरात सहज उपलब्ध आहेत. म्हणजेच स्मार्टफोन हे फीचर फोनच्या तुलनेत सुमारे ७ पट महाग ठरतात.
बाजारातील आकडेवारीनुसार, ₹५ ते ₹१० हजार या सेगमेंटचा बाजारातील वाटा सुमारे २४% आहे, ज्यामध्ये ७१% मॉडेल्स आता 5G तंत्रज्ञानाचे झाले आहेत. मात्र ₹१५ हजारांखालील 4G स्मार्टफोनचा वाटा फक्त ४% राहिला आहे. यामुळे कमी किमतीत उपलब्ध पर्याय मर्यादित होत चालले आहेत.
काउंटरपॉइंट रिसर्चचे संचालक तरुण पाठक यांच्या मते, 4G फीचर फोनवरून 4G स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी किमान ₹४ हजारांचा अतिरिक्त खर्च येतो. जर ग्राहकाने 5G स्मार्टफोन निवडला, तर हा खर्च ₹६ हजारांपर्यंत वाढतो. मेमरी चिपच्या तुटवड्यामुळे किंमतीत आणखी वाढ झाल्यास हा डिजिटल दरीचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
एकूणच, देशात डिजिटल सक्षमीकरणाची गती वाढवण्यासाठी स्वस्त आणि परवडणारे स्मार्टफोन उपलब्ध करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा, कोट्यवधी फीचर फोन वापरकर्ते डिजिटल प्रवाहापासून दूर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



