जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात क्रीडाक्षेत्राला नवी उभारी देणाऱ्या ‘अस्मिता खेलो इंडिया सिटी व्हॉलीबॉल लीग’चा आज शनिवार, ४ एप्रिल रोजी उत्साहात शुभारंभ झाला. शहरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे महिला व युवतींना क्रीडा क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
या लीगचे उद्घाटन जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. अमृता सोनवणे, नगरसेविका प्रतीक्षा सोनवणे आणि नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर भगतसिंग निकम, प्रदीप तळवलकर, व्हॉलीबॉल राज्य संघटनेचे सचिव डॉ. देवदत्त पाटील आणि सतीश मल्हाकार यांनीही हजेरी लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

‘खेलो इंडिया’ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या लीगचा मुख्य उद्देश स्थानिक स्तरावरील महिला खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सुप्त प्रतिभांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकण्याच्या शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत विविध संघांनी सहभाग नोंदवला असून, पुढील काही दिवस जळगावकरांना व्हॉलीबॉलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक संघ आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करण्यासाठी सज्ज आहे. या लीगमुळे जळगावच्या क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आयोजकांनी केले. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात यशस्वी ठरला.



