जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जळगाव जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रवेशासाठीची लॉटरी (सोडत) काढण्यात येणार आहे. यंदा मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यामुळे पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील २५४ शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती. या कालावधीत एकूण ९ हजार ८९६ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातून ३ हजार ३५० जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.

ही सोडत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे पार पडणार असून, तिचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना या प्रक्रियेत ऑनलाईन उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पालकांना मोबाईल संदेशाद्वारे निकालाची माहिती देण्यात येणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला तत्काळ सुरुवात केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३,३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्याचबरोबर ३,३५० विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेबाबत पालकांमध्ये मोठी उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाली आहे.



