Home क्राईम भोंदू खरात प्रकरणात सरकारी वकील मिसरांची माघार !

भोंदू खरात प्रकरणात सरकारी वकील मिसरांची माघार !


नाशिक-वृत्तसेवा । नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आजच्या सुनावणीपूर्वीच महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसरा यांनी या प्रकरणातून माघार घेतल्याने तपास यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, न्यायालयाने अशोक खरात याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अशोक खरात याची पोलिस कोठडी संपत असल्याने विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयाकडे कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पुढील तपासासाठी एसआयटीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणात युक्तिवादासाठी एसआयटीने अजय मिसरा यांना लेखी विनंती केली होती. मात्र त्यांनी सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या खटल्यांचा ताण असल्याचे कारण देत ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. विशेषतः २०११ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी संबंधित खटले आणि इतर गंभीर प्रकरणांमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजय मिसरा यांच्या माघारीनंतर आता या प्रकरणाची जबाबदारी सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पुढील सुनावण्यांमध्ये तेच न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत.

दरम्यान, अशोक खरातविरोधात दररोज नव्या तक्रारी समोर येत असून लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर आरोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे एसआयटीकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

तपासादरम्यान काल महत्त्वाची कारवाई करण्यात आली. एसआयटीने अशोक खरातसमोरच त्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाला बसवून तब्बल सहा तास चौकशी केली. या चौकशीतून सोनं, रत्न आणि मौल्यवान खड्यांच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच पुण्यातील एका बँकेशी संबंधित कर्ज व्यवहारात अनियमितता आणि सुमारे एक कोटी रुपयांच्या लाचेचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीवरून अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, तसेच अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्याविरोधात फसवणूक व सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पना खरात फरार असून अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्जाच्या बदल्यात जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून शिर्डीतील कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशीही सुरू आहे.

एकूणच, अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून तपासाचा वेग वाढला आहे. विशेष सरकारी वकिलांच्या माघारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एसआयटीसमोर आता कायदेशीर लढाई अधिक कठीण बनली असली तरी पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound