Home उद्योग मसाकाच्या २३ हजार ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ; राकेश फेगडेंच्या पाठपुराव्याला यश

मसाकाच्या २३ हजार ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ; राकेश फेगडेंच्या पाठपुराव्याला यश


यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून मधुकर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित तब्बल २३ हजार शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कपातीची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मधुकर सहकारी साखर कारखाना हा गाळप क्षमता आणि साखर उत्पादनाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. या कारखान्याने गाळप हंगाम २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बिलातून प्रति टन ५० रुपये या प्रमाणे पूर्व हंगामी ठेव म्हणून कपात केली होती. ही रक्कम परत मिळावी यासाठी शेतकरी सातत्याने मागणी करत होते. या मागणीसाठी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच विद्यमान संचालक राकेश वसंत फेगडे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

राकेश फेगडे यांनी सांगितले की, सुरुवातीला या मागणीला फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. अनेकांनी ही बाब अशक्य असल्याचे म्हटले, तर काहींनी दुर्लक्ष केले. मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला. अखेर ठाम भूमिका, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ही मागणी मान्य करण्यात आली असून २३ हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ४ कोटी ३ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तांनी संबंधित ठेवीच्या मुद्दल रकमेपैकी ५५ टक्के रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे १५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गौतम बलसाने यांनी केले आहे. प्रशासनाकडून प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या निर्णयामुळे यावल तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी फेगडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत “जे शक्य वाटत नव्हते ते त्यांनी करून दाखवले” अशी भावना व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना राकेश फेगडे यांनी हा विजय स्वतःचा नसून शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि त्यांच्या विश्वासाचा असल्याचे नमूद केले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठीचा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound