Home Cities रावेर गाते गावाजवळ रेल्वे गेट कायम बंद; उड्डाण पुलाचे रखडलेले काम ठरले नागरिकांसाठी...

गाते गावाजवळ रेल्वे गेट कायम बंद; उड्डाण पुलाचे रखडलेले काम ठरले नागरिकांसाठी डोकेदुखी


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यातील गाते गावाजवळील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे गेट आज, २८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने या निर्णयाबाबतचा सूचना फलक गेटवर लावला असून, अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर ठिकाणी उड्डाण पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण होत नसल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने गेट बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या गेटचा वापर करून अनेक नागरिक दैनंदिन प्रवास करत होते, तसेच शेतकरी आणि व्यावसायिक वर्गासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा होता.

रेल्वे गेट बंद झाल्यामुळे विशेषतः मोठ्या मालवाहू वाहनांना मोठा फटका बसणार आहे. पर्यायी मार्गाची स्पष्ट व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना लांबचा फेरा मारावा लागणार असून त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडी आणि गैरसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित विभागाला मागील वर्षभरापासून उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने गेट कायम बंद ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत उड्डाण पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


Protected Content

Play sound