जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ०९०५१/०९०५२ मुंबई सेंट्रल – भुसावळ ही ‘स्पेशल’ म्हणून धावणारी गाडी आता नियमित करण्याच्या हालचालींना वेग आला असून, तसा अधिकृत प्रस्ताव पश्चिम रेल्वेच्या मुख्यालय कार्यालयाकडून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. अशी माहिती प्रतीक जैन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
धरणगाव येथील झेडआरयूसीसी सदस्य प्रतीक जैन यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून (०९०५१/०९०५२) मुंबई-भुसावळ स्पेशल एक्स्प्रेस नियमित करण्याची आग्रही मागणी केली होती. या गाडीला प्रवाशांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची गरज लक्षात घेता, ही गाडी कायमस्वरूपी चालवण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती.

प्रशासनाची सकारात्मक भूमिका:
प्रतीक जैन यांच्या मागणीची दखल घेत पश्चिम रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापक कार्यालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेने दिलेल्या अधिकृत उत्तरानुसार, या गाडीचे नियमन करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आधीच पाठवण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.
या स्थानकावर थांबणार रेल्वे :
DDR BSL SPL (09051) ही रेल्वे मध्यरात्री १२ वाजता दादर येथून सुटणार आहे, तिचा मार्ग दादर, बोरीवली, विरार, पालघर, भोईसर, डहाणू रोड, वापी, वलसाड, नवसारी, भेस्तान, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदूरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ असा राहणार असून भुसावळ येथे दुपारी १२ वाजता पोहचणार आहे.
BSL DDR SPL (09052) ही रेल्वे सायंकाळी ५ वाजू ४० मिनीटांनी भूसावळ येथून सुटणार आहे. तिचा मार्ग भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, सिंदखेडा, दोंडाईचा, नंदूरबार, नवापूर, व्यारा, बारडोली, भेस्तान, नवसारी, वलसाड, वापी, डहाणू, भोईसर, पालघर, विरार आणि दादर रेल्वे स्टेशन असा राहणार असून दादरला दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाच वाजता पोहचणार आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार:
जर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला, तर मुंबई ते भुसावळ आणि दरम्यानच्या धरणगाव, जळगाव परिसरातील हजारो प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. सध्या ही गाडी विशेष म्हणून धावत असल्याने तिच्या वेळापत्रकात अनिश्चितता असते, मात्र नियमित झाल्यानंतर प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षणाची सुविधा उपलब्ध होईल.



