जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
उष्माघात, निर्जलीकरण यांसारख्या उष्णताजन्य आजारांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे, तसेच प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS), लिंबूपाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करावा, असेही सांगण्यात आले आहे.

तसेच, टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस आणि काकडी यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे-भाज्यांचे सेवन करावे. उन्हापासून बचावासाठी पातळ, सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करावा. शक्यतो सकाळी व संध्याकाळीच बाहेरील कामे करावीत, तर दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच घराबाहेर काम करणारे कामगार आणि हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर नियमित लक्ष ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा शटरचा वापर करावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंखा, ओलसर कापड, पाण्याचा स्प्रे किंवा बर्फाचा वापर करावा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळावीत आणि अनवाणी बाहेर जाणे टाळावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, उष्णतेच्या काळात अल्कोहोल, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळावे. उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. विशेषतः उभ्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत, यावरही प्रशासनाने भर दिला आहे.
उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वरील सर्व उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.



