जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकावर आता अंतिम निर्णयाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सुमारे १४५२ कोटी रुपयांचे भव्य अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केले असून, यावर सखोल चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने तयार केलेले हे अंदाजपत्रक यापूर्वी मंगळवार, दि. १० मार्च रोजी विशेष सभेत स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले होते. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकाची माहिती सभापतींकडे सादर केली होती. त्यानंतर अंदाजपत्रकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सभापतींनी बैठक स्थगित केली होती.

आता होणाऱ्या बैठकीत सदस्यांकडून अंदाजपत्रकातील विविध तरतुदींवर चर्चा होऊन आवश्यक त्या बदलांच्या सूचना मांडल्या जाणार आहेत. या सूचनांनंतर अंदाजपत्रक महासभेसमोर ठेवण्यात येईल. महासभेत होणाऱ्या चर्चेनंतर आणि बदलांच्या मंजुरीनंतरच या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाचा आराखडा ठरवणारे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. त्यामुळे या १४०० कोटींच्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली जाणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विशेषतः पायाभूत सुविधांसाठी किती निधी दिला जातो, कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य मिळते आणि कोणत्या खर्चांमध्ये कपात केली जाते, यावरून शहराच्या विकासाचा वेग आणि दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाकडे नागरिकांसह सर्वच स्तरांतून उत्सुकतेने पाहिले जात आहे.



