Home धर्म-समाज मोठे वाघोदे येथे हिंदू संमेलन उत्साहात

मोठे वाघोदे येथे हिंदू संमेलन उत्साहात


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. सकल हिंदू समाज चिनावल मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विजयकुमार पाटील होते, तर विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय संघटन महामंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते मिलिंद परांडे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज तसेच पंडित दिवाकर बाबा शास्त्री यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते मिलिंद परांडे यांचा गौरव करण्यात आला. तसेच महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज व दिवाकर बाबा शास्त्री यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे आणि भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाजन यांनी मिलिंद परांडे यांना ‘जय हिंद, वंदे मातरम्’ असा संदेश असलेला मफलर, पेन आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम’ हे पुस्तक भेट देत सन्मानित केले. या भेटीमुळे कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण झाले.

मनोगत व्यक्त करताना महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज यांनी हिंदू समाजातील जातीय भेदभाव, मतभेद आणि संघर्ष दूर करून समाज अधिक एकसंध व समरस करण्याची गरज अधोरेखित केली. तर मिलिंद परांडे यांनी हिंदू संमेलनाचे उद्दिष्ट स्पष्ट करत भारतीय संस्कृतीचे जतन, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमाला राहुल महाजन, स्वप्नील पवार, कांतीलाल महाजन, डॉ. गुरुदत्त पाटील, बाळू महाजन, गंभीर महाजन, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, कमलाकर माळी, दत्ता पाटील, मेघनाथ पाटील, कृष्णा पाटील, हर्षल पाटील, सनी मोरे यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि चिनावल मंडळातील आठ गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक कुलभूषण पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्नील पवार यांनी मानले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.


Protected Content

Play sound