Home धर्म-समाज कुंभारखेड्यात नवरात्रोत्सवात सख्या नऊ बहिणींचे पूजन

कुंभारखेड्यात नवरात्रोत्सवात सख्या नऊ बहिणींचे पूजन


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहानिमित्त नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र प्रसंगी सख्या नऊ बहिणींचे विधिवत पूजन करण्यात येऊन स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला.

महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या हस्ते मनूभाई काठीयावाडी परिवारातील नऊ बहिणींचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. नवरात्राच्या निमित्ताने कन्या पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व असून, या उपक्रमातून देवीच्या विविध रूपांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याने उपस्थितांमध्ये आध्यात्मिक भावना अधिक दृढ झाली.

या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. ह. भ. प. रवींद्र हरणे महाराज, रवींद्रभैय्या पाटील, नरेंद्र नारखेडे यांच्यासह परिसरातील अनेक भक्तगण उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते आणि सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

या उपक्रमामुळे समाजात स्त्रीशक्तीबद्दल आदर निर्माण होण्यास मदत होत असून, अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे परंपरांचा जप होण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत योग्य संदेश पोहोचतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound