भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भुसावळ शहरात घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका, ता. भुसावळ) यांनी धनश्री पाटील यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. मात्र, हा विवाह मुलीच्या नातेवाईकांना मान्य नव्हता. याच गोष्टीचा राग मनात धरून, २० मार्च रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास भुसावळ येथील सुहास हॉटेलजवळ आरोपींनी चेतनला गाठले.

संशयित आरोपी मनोज पाटील, रूपाली पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर १० ते १२ जणांनी फिर्यादीला जबरदस्तीने ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या आरोपींनी चेतनचा रुमालाने गळा आवळून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्याचे घर जाळून टाकण्याची धमकी देऊन त्याच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ व मारहाण केली.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी चेतन जंगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत आहेत.



