Home Cities जळगाव २० हजार मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत ईद उल फित्रची नमाज अदा

२० हजार मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत ईद उल फित्रची नमाज अदा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल फित्र (रमझान ईद) निमित्त जळगाव शहरात आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात नमाज अदा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुन्नी मुस्लिम बांधवांनी सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, सुप्रीम कॉलोनी येथे एकत्र येत अत्यंत भक्तीभावाने ईदची नमाज अदा केली.

आज शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी सकाळी नेमक्या नऊ वाजता मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वाखाली नमाजे ईद उल फित्र अदा करण्यात आली. नमाजासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानात हजेरी लावली होती. संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते आणि सर्वत्र एकात्मता व बंधुत्वाची भावना दिसून आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थित सर्व नमाजी बांधवांना ईद मुबारक देत शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्रस्टच्या वतीने वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा मांडला तसेच आगामी योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेत ईद साजरी करावी असे आवाहन केले. नमाजासाठी प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल जळगाव महानगरपालिका, महापौर, आयुक्त, आरोग्य अधिकारी उदय पाटील, स्थानिक नगरसेवक तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभारही त्यांनी मानले.

या प्रसंगी खुतबा मौलाना जाबीर रजा अमजदी यांनी सादर केला, तरिका-ए-नमाज मौलाना नजमुल हक यांनी सांगितले आणि सलातो सलाम मौलाना झुबेर आलम यांनी पठण केले. त्यानंतर देशाच्या शांतता, प्रगती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष दुआ करण्यात आली. “ए अल्लाह, हमारे अजीम मुल्क भारत में अम्न कायम रख, बेरोजगारी दूर कर, बीमारों को शिफा दे और हर आफत से हिफाजत कर” अशी प्रार्थना करण्यात आली, ज्याला सर्वांनी ‘आमीन’ म्हणत प्रतिसाद दिला. यावेळी नात-ए-पाक आणि दरूद पठणही करण्यात आले.

या धार्मिक सोहळ्यास सुमारे २० हजार सुन्नी मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा अमजदी, मौलाना नजमुल हक, इकबाल वजीर, मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना झुबेर आलम अशरफी, मौलाना खलील अहमद बरकाती, मौलाना अब्दुल मतीन, मौलाना अब्दुल हमीद, मुख्तार शाह, सय्यद जावेद, शाकीर चित्तलवाला, झरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound