मुंबई-वृत्तसेवा । भोंदू ज्योतीष्यी अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणामुळे राज्य हादरले आहे. तर खरात याच्याशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे रूपाली चाकणकर या देखील वादात सापडल्या आहेत. त्यांनी आधी या प्रकरणी नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केला. आज सायंकाळी मात्र त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली. यानंतर थोड्याच वेळाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या
पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.



