Home Cities अमळनेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रताप संवाद’ पत्रिकेचे विमोचन

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रताप संवाद’ पत्रिकेचे विमोचन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामांकित संस्थेच्या ‘प्रताप संवाद’ या शैक्षणिक ई-मासिकाचे विमोचन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात सुसंवाद आणि डिजिटल माध्यमातून माहिती प्रसाराला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

या विशेष सोहळ्यास राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार तथा मंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसहकार्यवाह व्यंकैयाजी भागैय्या, पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी आणि अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे आणि अन्य मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते.

‘प्रताप संवाद’ या पत्रिकेचा मुख्य उद्देश विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेमधील घटकांमध्ये प्रभावी सुसंवाद प्रस्थापित करणे हा आहे. “संकल्प एक, ध्येय अनेक, सुसंवादासाठीच हे लेख” या ब्रीदवाक्यावर आधारित ही पत्रिका संस्थेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची यशोगाथा आणि शैक्षणिक घडामोडी सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम ठरणार आहे.

ही पत्रिका पूर्णपणे डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत सहज पोहोचवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या मासिकात कोणत्याही प्रकारच्या राजकीय बातम्यांचा समावेश केला जाणार नसून, ते पूर्णपणे शैक्षणिक आणि प्रेरणादायी विषयांवर केंद्रित राहणार आहे.

कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या सुसंवादातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर आणि आयुष्यात योग्य दिशा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते आणि अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्रिकेचे प्रकाशन झाल्यामुळे संस्थेच्या या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound