श्योपूर- वृत्तसेवा । ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ५० लाख रुपये जिंकून एकेकाळी चर्चेत आलेल्या मध्य प्रदेशातील तहसीलदार अमिता सिंह तोमर यांच्यावर आता गंभीर आरोपांची छाया पडली असून पूर मदतनिधी घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटकेचा सामना करावा लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या अमिता सिंह तोमर या 2021 मधील पूर परिस्थितीनंतर मदत वितरणाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आल्या आहेत. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने निधी वितरित केला होता. मात्र तपासात असे उघड झाले की, बदौता तालुक्यात कार्यरत असताना त्यांनी सुमारे २५ तलाठी आणि १०० हून अधिक दलालांच्या संगनमताने १२७ बनावट खात्यांद्वारे सुमारे २.५७ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा उलगडा उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या लेखापरीक्षणातून झाला. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना पूरग्रस्त दाखवून त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्यात तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि दलाल यांच्यातील संगनमतही समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १०० हून अधिक जणांना आरोपी केले असून त्यात अमिता सिंह तोमर यांच्यासह २५ तलाठ्यांचाही समावेश आहे. अटकेपासून बचावासाठी तोमर यांनी प्रथम उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता अमिता सिंह तोमर यांच्यासमोर आत्मसमर्पण करण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नसल्याचे सांगितले जात आहे. अन्यथा पोलिसांकडून कोणत्याही क्षणी त्यांना अटक केली जाऊ शकते. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



