फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीत ‘रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली’च्या स्थापनेने समाजसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून विविध क्षेत्रात शाश्वत विकास साधत जनसामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. रोटरी ही केवळ संस्था नसून समाजासाठी काम करताना व्यक्तीला समृद्ध आयुष्य जगण्याची अनुभूती देणारे व्यासपीठ असल्याचे मत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे यांनी व्यक्त केले.
शुभदिव्य मंगल कार्यालय, फैजपूर येथे आयोजित चार्टर इंस्टॉलेशन सेरेमनीत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. मंचावर असिस्टंट गव्हर्नर तथा चोपडा उपनगराध्यक्ष रोटे. पंकज बोरोले, प्रांताधिकारी बबन काकडे, रोटे. डॉ. राजेश पाटील, रोटरी क्लब ऑफ चोपडा अध्यक्ष रोटे. आशिष जयस्वाल, सचिव रोटे. विश्वास दलाल यांच्यासह नव्याने स्थापन झालेल्या क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट पांडुरंग सराफ, चार्टर्ड सेक्रेटरी श्रीकांत भुयार आणि कोषाध्यक्ष निलेश चौधरी उपस्थित होते.

या सोहळ्यात सुमारे 40 नवीन रोटेरियन्सनी पदग्रहण करून सामाजिक कार्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प केला. जळगाव, रावेर व यावल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष दामिनी सराफ, धनंजय चौधरी, लीलाधर चौधरी, ज्ञानेश्वर बढे, अजित महाजन, नगरसेविका नीलिमा महाजन, सुनिता नेहेते, भावना भारंबे आणि युगंधर पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
फैजपूर शहराच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करत या ठिकाणी 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन आणि 2011 मध्ये अखिल भारतीय संत संमेलन पार पडल्याचे सांगण्यात आले. त्याच धर्तीवर रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅलीच्या स्थापनेमुळे शहराच्या सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाला नवे बळ मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला.
रोटे. डॉ. राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुणांची जडणघडण आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होत असल्याचे नमूद केले. प्रांताधिकारी बबन काकडे यांनीही या परिसरात रोटरी क्लबची गरज असल्याचे सांगत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येऊन समाजहितासाठी काम करणे ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे गौरवोद्गार काढले.
नवीन क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट पांडुरंग सराफ यांनी फैजपूरमध्ये रोटरी क्लब स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त करत आगामी काळात विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व पर्यावरणीय प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याची ग्वाही दिली. या क्लबच्या स्थापनेसाठी रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने करण्यात आली तर समारोप ‘वंदे मातरम’ने झाला. सूत्रसंचालन रोटे. संजय बारी आणि रोटे. राजेंद्र राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकांत भुयार यांनी केले.



